पंचायतनामधील ही आणखीन एक मुख्य देवता आहे. शक्ती, जगदंबा, आदिमाया इत्यादी नावांनी ही ओळखली जाते. परब्रह्माशी तुलना केली जाणारी अशी ही संप्रदायातील मुख्य देवता आहे. देवीचे वर्णन मुख्य शक्ती, प्रमुख प्रकृती, सद्गुण योगमाया, बुद्धिमत्तेची जननी आणि विकृतीपासून मुक्त असे केले आहे. ती अंधार आणि अज्ञानाच्या दुरात्म्यांपासून आपले रक्षण करते. शांतता, समृद्धी आणि धर्म यांवर आक्रमण करण्याचा राक्षसी शक्तींचा ती नाश करते.
देवी पंचायतनामध्ये देवी मध्यभागी ठेवून चार बाजूला ईशान्य दिशेपासून वायव्य दिशेपर्यंत अनुक्रमे विष्णू, शिव, गणेश व सूर्य या देवतांची स्थापना केली जाते. देवींची अनेक रूपे प्रसिद्ध आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महिषासुरमर्दिनी, शाकंभरी, आदिशक्ती इत्यादी काही नावे प्रचलित आहेत. देवींची बावन्न शक्तीपीठे हे सुद्धा अत्यंत पवित्र स्थान मानले गेले आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांचे ध्यान व पूजन करून मोठा उत्सव साजरा केला जातो. देवीला उद्देशून करण्यात येणारी धार्मिक कार्ये खालीलप्रमाणे आहेत-
दुर्गा सप्तशती पाठ, नवचंडी याग, शतचंडी याग, अयुतचंडी याग, कुंकुमार्चन, देवी कवच जप, देवी अथर्वशीर्ष जप, घटस्थापना व शारदीय नवरात्री पूजा, देवी अभिषेक पूजा, मंगळागौरी पूजा, सत्यअंबा पूजा, लक्ष्मीपूजन, ललितापंचमी पूजा, शाकंभरी नवरात्री पूजा.